0


मुंबई:- देशासह महाराष्ट्रात २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना नांदेड लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून काँग्रेसची राजकीय इज्जत वाचविणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत विरोधकांची मोट बांधून चीत करण्याचा भाजपने मांडलेला सारीपाट नांदेडकरांनी उधळून लावला.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व एमआयएम या सर्वच विरोधकांची धूळदाण उडवत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या.

राज्यात महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा अश्वमेध चव्हाण यांनी नांदेडमध्ये रोखला. हा विजय आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसला हुरूप देणारा आहे, तर दुसरीकडे भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीला यावेळी काँग्रेस व भाजपसह सर्वच पक्षांनी कमालीचे महत्त्व दिले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ नांदेड व हिंगोली अशा दोनच जागा ‌जिंकल्या होत्या. त्यात नांदेडची जागा होती. त्यातच चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजपने नांदेड महापालिकेची निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची बनविली. राज्य मंत्रिमंडळ नांदेडमध्ये ठाण मांडून होते. त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार ‌प्रताप चिखलीकर भाजपचा प्रचार करत होते. चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे समर्थक. तेव्हा ते अपक्ष आमदार होते. चव्हाण यांना नांदेडच्या राजकारणात शह देण्यासाठी विलासरावांनी तेव्हा चिखलीकरांना ताकद दिली होती. त्यानंतर चिखलीकर राष्ट्रवादीत गेले. मात्र नंतर शिवसेनेत जावून आमदार झाले. या निवडणुकीत चव्हाणांना शह देण्यासाठी त्यांनी थेट भाजपच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला. भाजपने सर्व ताकद त्यांना दिली. चव्हाण यांना सोडून गेलेल्या नेत्यांची मोट भाजपने नांदेडमध्ये बांधली. पण भाजपच्या पदरी निराशा पडली. जनाधार नसलेल्या नेत्यांना एकत्र करून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे या निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केले.

Post a Comment

 
Top