
कल्याण : ठाकुर्लीनजीक केडीएमटीच्या खंबाळपाडा आगारात उभ्या केल्या जात असलेल्या कचरागाड्यांमधील डिझेलचोरीचा प्रयत्न तेथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे रविवारी रात्री फसला. या सुरक्षारक्षकांवर चोरट्यांनी दगडफेक केली. कोणालाही दुखापत झाली नसली, तरी दगडफेकीत एका घंटागाडीची काच फुटली.
खंबाळपाडा परिसरात केडीएमटीच्या आगारासाठी आरक्षित जागा आहे. तेथे केडीएमटीच्या बस उभ्या करण्याचे आणि डिझेलपंप उभारण्याचे प्रस्तावित आहे. ती जागा सध्या कच-याच्या गाड्यांनी बळकावली आहे. हे आगार असुरक्षित आहे. रविवारी रात्री तेथील कचºयाच्या गाडीतून डिझेल चोरण्याचा प्रयत्न झाला. पण सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. केडीएमसीने तेथे महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे सहा सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यातील संतोष शिंदे आणि सचिन शेलार हे दोघेच रात्रपाळीला होते. रात्री १० च्या सुमारास यातील शिंदे गस्त घालत असताना त्यांना चार ते पाच जणांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसले. त्यांनी ते शेलार यांना सांगितले आणि दोघांनी त्यांना हटकले तेव्हा ते पळाले, पण पळताना त्यांनी दगडफेक केली. यात त्यांना दुखापत झाली नाही. परंतु, घंटागाडीची काच फुटून नुकसान झाले. आगारात शिरलेल्या चोरट्यांकडून कचºयाच्या गाडीतील डिझेल चोरले जात होते. तेथे दोन डिझेलने भरलेले मोठे कॅन आणि डिझेल काढण्यासाठी वापरलेला पाइप सापडला. या घटनेची माहिती पालिकेचे वरिष्ठ सुरक्षारक्षक सुरेश पवार यांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन टिळकनगर पोलिसांना बोलावले. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
सुरक्षा राखायची तरी कशी?
असुविधा असलेल्या खंबाळपाडा आगारात सुरक्षा राखायची तरी कशी, असा सवाल येथील सुरक्षा कर्मचाºयांकडून उपस्थित होत आहे. अपुºया लाइटची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची बोंब आणि स्वच्छतागृहाचा अभाव यात सुरक्षारक्षकांची पुरती दमछाक होताना दिसते.
आगाराच्या पाठीमागील भागात वसाहत वसली असून त्या वसाहतीसाठी वाटही या खंबाळपाडा आगारातूनच असल्याने सुरक्षा राखणे जिकिरीचे होऊन बसल्याचे येथील कर्मचाºयांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी या आगारातील गाड्यांमधील बॅटºया चोरीला गेल्या होत्या. परंतु, सुरक्षारक्षकांकडून याची भरपाई घेताना त्यांना प्रशासनाने निलंबित केले होते.
एकीकडे सुविधा पुरवल्या नसताना अशाप्रकारची केलेली कारवाई कर्मचाºयांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. विशेष म्हणजे एखादी घटना घडल्यानंतरच जाग येते, या उक्तीनुसार रविवारची घटना घडताच तेथे तत्काळ तात्पुरत्या स्वरूपात विजेची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले.
Post a Comment