
मुंबई- मोर्चासाठी निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांसमोरच मीरा रोड रेल्वे स्थानकात एका टोळक्याने रेल्वेत घुसून प्रवाशांना बेदम मारहाण केली.
भायंदरहून दादरच्या दिशेने निघालेली लोकल सकाळी पावणेदहाच्या सुमारास मीरा रोड स्थानकात पोहचली असता एका टोळक्याने रेल्वेत घुसून प्रवाशांना बेदम मारहाण केली. गाडी सुरु होताच त्यांनी उड्या मारुन पळ काढला.
यावेळी उपस्थितांपैकी कुणीही हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली नाही. आज मनसेचा मुंबईत मोर्चा निघणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले २५-३० तरुण तेथे उपस्थित होते. रेल्वेतही गर्दी होती. तरीही सर्वांसमोर भरदिवसा प्रवाशांना मारहाण होत असताना सर्वांनी बघ्याची भूमिका घेतल्याने मुंबईकरांची मानसिकता किती खालच्या थराला पोहचली, याचे प्रत्यय या निमित्ताने आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी याच लोकलमध्ये दोन गटात बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात ठेऊन आज वचपा काढण्यात आल्याची प्रवाशांमध्ये चर्चा आहे.
रेल्वे प्रवासात बोरिवली ते विरार दरम्यानच्या प्रवाशांना या टोळ्यांकडून नेहमीच त्रास दिला जातो. बसण्यास जागा न देणे, दादागिरीने दरवाजा अडवण्यासारख्या घटना दररोज घडत असतात. यामुळे रोज प्रवाशांमध्ये खटके उडतात. त्यासाठी धमकी देणे, प्रसंगी मारहाणही करण्यात येते़.
याबाबत प्रवाशांकडून अनेकवेळा पोलिसांकडे तक्रार करण्यात येते. परंतु त्यांच्यावर रेल्वे पोलिसांकडून वेळीच कारवाई करण्यात येत नसल्यामुळे हा प्रकार आता मारहाणीपर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान, रेल्वे पोलिस कोणतीही कारवाई न करता ते बघ्याची भूमिका घेतात, असा आरोप रेल्वे प्रवाशांनी केला आहे.
Post a Comment