0


ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह काही आरोपींना भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून, त्याला यश प्राप्त होईल असेच वाटते. या खटल्यातील कोणत्याही आरोपीविरोधात सीबीआयचे वकील म्हणून खटला लढविण्यास मी तयार असून, दाऊदला फाशी देण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲड. दीपक साळवी यांनी काल येथे दिली.
‘विचार व्यासपीठ’च्या वतीने ॲड. दीपक साळवी यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट खटला लढविताना आलेले अनुभव साळवी यांनी नागरिकांसमोर व्यक्त केले. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील ७ आरोपींना शिक्षा झाली असून, अद्यापी २७ विशेष आरोपी फरारी आहेत. आता ठाणे पोलिसांनी इक्‍बाल कासकरला अटक केल्यामुळे काही फरारी आरोपी मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच कासकरच्या चौकशीत मिळालेल्या पुराव्यामुळे, दाऊदला लवकरच भारतात आणले जाण्याची शक्‍यता आहे, असे ते म्हणाले.
मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हा खटला हाती घेतला. त्यानंतर तब्बल दीड लाख पाने वाचूनही हातात काहीच सबळ पुरावे नसल्याने मला नैराश्‍य आले होते. एका वरिष्ठ वकिलाने या खटल्याची तुलना मेलेला घोडा अशीच केली होती. 
या प्रकरणातील सात आरोपी सुटण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. त्या वेळी मी देशासाठी काही तरी करायचे, या भावनेने कामाला लागलो. वीटनेस प्रोटेक्‍शन कायद्याचा आधार घेत सुमारे ४०० साक्षीदारांची साक्ष नोंदवून आरोपींना शिक्षा ठोठावली, असे ॲड. साळवी यांनी सांगितले. या वेळी विचार व्यासपीठचे संजीव ब्रह्मे, अभय मराठे, माजी न्यायमूर्ती सदाशिव देशमुख, मकरंद मुळे, महेंद्र मोने आदी उपस्थित होते. 
...अन्‌ फिरोजची ओळख पटली
आरोपी फिरोज अब्दुल रशीद खान याने मी हमजा खान असल्याचा दावा केला. याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ते वाचून त्याला बालपणापासून ओळखणारी व्यक्ती साक्षीदार झाली. या व्यक्तीने तब्बल १८ ते २० दिवस साक्ष दिली. फिरोजच्या हनुवटीवर टाके असल्याचे त्याने सांगितले. अखेर दाढी काढल्यानंतर हनुवटीवरील टाके आढळले. त्यानंतर फिरोजचा दावा फेटाळला गेला, अशी आठवण ॲड. साळवी यांनी सांगितली.

Post a Comment

 
Top