0


मुंबई:- ‘मला विरोध करणारा कोणी असेल तर त्याला संपवायला हवे’ अशी घातक प्रथा सध्या देशात सुरू आहे. स्वतंत्र विचार, विरोधी मते मांडणारे यांच्याविषयी आदर ठेवण्याऐवजी त्यांना ‘लक्ष्य’ करण्याचा हा प्रकार आहे. हे अत्यंत धोकादायक तर आहेच, परंतु आपल्या देशाची प्रतिमा व प्रतिष्ठा याच्यासाठीही घातक आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे आणि कर्नाटकमध्ये कन्नड साहित्यिक एम. एम. कलबुर्गी या लेखक-विचारवंतांच्या हत्या झाल्यानंतर कर्नाटकमध्येच काही दिवसांपूर्वी संपादक गौरी लंकेश यांची हत्या झाली. त्या संदर्भात न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गुरुवारी दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणाच्या पुढील सुनावणीदरम्यान हे मतप्रदर्शन केले. या सुनावणीदरम्यान, दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयने आणि पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एसआयटीने तपासाचे प्रगती अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर केले. ते पाहिल्यानंतर खंडपीठाने काहीसे समाधान व्यक्त केले. मात्र त्याचवेळी ‘तुमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे दिसत असले तरी अद्याप हत्यांमागचे मुख्य सूत्रधार मोकाट आहेत. त्यामुळे तपासाचे ठोस निकाल लवकर दिसायला हवेत. कारण सध्याचे वास्तव हे आहे की, दोन सुनावणीच्या मधल्या काळातही मौल्यवान व्यक्ती आपण गमावून बसत आहोत’, असा खेद न्या. धर्माधिकारी यांनी गौरी लंकेश यांच्या संदर्भात व्यक्त केला. तपासयंत्रणांनी तपासाची दिशा बदलून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत’, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. दाभोलकर यांची हत्या सारंग अकोलकर व विनय पवार यांनी केली असल्याच्या निष्कर्षापर्यंत सीबीआय आले असताना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही, याकडे‌ही खंडपीठाने लक्ष वेधले.

तपास यंत्रणांकडून सनातन संस्थेची चौकशी होत नसल्याचे म्हणणे दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांतर्फे अॅड. अभय नेवगी यांनी मांडले. मात्र, त्याचा खंडपीठाने इन्कार केला. ‘तपासातील बाबी आम्ही उघड करू शकत नाही. मात्र, हे अहवाल पाहिल्यानंतर तपासयंत्रणा सर्व दिशांनी तपास करत असल्याचे आम्ही सांगू शकतो आणि त्यांनी सनातन संस्थेच्या शक्यतेकडेही दुर्लक्ष केलेले नाही’, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Post a Comment

 
Top