
नांदेड- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. आतापर्यंत ७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यातील ६९ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. रात्री उशिरापर्यंत एका प्रभागातील चार जागांसाठी मतमोजणी सुरु होती. या चारही जागांवर काँग्रेस आघाडीवर होती.
मुख्यमंत्र्यांसह १० मंत्र्यांनी नांदेडमध्ये सभा घेतल्यानंतरही भाजपला केवळ ६ जागांवर विजय मिळविता आला आहे. शिवसेनेला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले असून एका अपक्षाने बाजी मारली आहे. मागच्या निवडणुकीत लक्षवेधी जागा मिळविलेल्या एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी भोपळाही फोडता आलेला नाही.
नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दोन सभा घेतल्या होत्या, तर कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासह १० मंत्री नांदेडमध्ये तळ ठोकून होते. निवडणूक जाहीर होताच काँग्रेसचे सात नगरसेवक भाजपने फोडले होते. या सर्वाना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला.
भाजपला केवळ ६ जागांवर विजय मिळविता आला. या उलट काँग्रेसला मागच्या पेक्षा तब्बल २८ जागा जास्त मिळाल्या आहेत. २०१२ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला काठावरचे बहुमत म्हणजे ४१ जागांवर विजय मिळाला होता. नांदेड महापालिका स्थापन झाल्यापासून येथे काँग्रेसची सत्ता आहे. एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत ५७८ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. ७७ जागांचे निकाल घोषित झाले असून रात्री उशिरापर्यंत एका प्रभागातील तीन जागांचा निकाल बाकी होता.
Post a Comment