0


पुणे : अनाथ असलेली ‘ती’ अवघ्या अकरा वर्षांची... तिला दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातील सुखवस्तू कुटुंबाने दत्तक घेतले... सर्व काही उत्तम चाललेले असतानाच अचानक ती ‘गायब’ झाली... सर्वत्र शोधाशोध करूनही तिचा पत्ता लागला नाही... नऊ महिन्यांनंतर तिचा अचानक वडिलांच्या मोबाईलवर फोन आला... वडील पोलिसांना घेऊन मनमाड रेल्वे स्थानकावर पोहोचले... काळीज पिळवटून टाकणारी तिची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला... आपल्यावर वारंवार बलात्कार झाल्याचे सांगताच वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला... मुलीला छातीशी कवटाळून त्यांनी घर गाठले...
एखाद्या सिनेमाचे कथानक वाटावे, अशी ही घटना लोहमार्ग पोलिसांमुळे उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील एका सुखवस्तू कुटुंबाने दोन वर्षांपूर्वी एका मुलीला अनाथाश्रमामधून दत्तक घेतले होते. ही मुलगी त्यांच्या घरी आनंदाने राहत होती. नुकतेच तिचे वडील सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्याला दत्तक घेण्यात आल्याचे तिला माहिती होते. दत्तक मुलगी असल्यामुळेच आई-वडील सतत बोलतात, त्रास देतात असे तिला वाटत होते. जानेवारी महिन्यात तिला चूक केली, म्हणून आई-वडील ओरडले होते. रागाच्या भरात ही मुलगी १० जानेवारी रोजी कोणाला काहीही न सांगता घरामधून निघून गेली. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून रेल्वे पकडून ती थेट पुण्याला आली. दरम्यान, तिच्या आई-वडिलांनी मिरज लोहमार्ग पोलिसांकडे अपहरणाची तक्रार नोंदवली. पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक हिम्मतराव माने पाटील, उपनिरीक्षक एन. डी. मुन्तोडे, कर्मचारी अमरदीप साळुंके, सुरेश जाधव, संतोष चांदणे, अनिल गुंदरे, नीलेश बिडकर यांनी तातडीने पुण्यातल्या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. वर्णनावरून एकाला ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलीने त्याला ओळखले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे़

ही मुलगी १० जानेवारीला पुणे रेल्वे स्थानकावर उतरली. दोन दिवस रेल्वे स्थानकावरच भुकेने व्याकूळ अवस्थेत फिरत राहिली. रेल्वे स्थानकावर तिला श्रीकांत नावाचा तरुण भेटला. भावनिक आधार देण्याचे नाटक करीत तो तिला येरवड्यातील भाजी मंडईशेजारील घरी घेऊन गेला. ही मुलगी दोन महिने त्याच्या घरी होती. या कालावधीत त्याने तिच्यावर पाच ते सहा वेळा बलात्कार केला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर मारहाण केली जात होती. एक दिवस संधी साधत ती तेथून पळाली. रेल्वेनेच ती नाशिकला गेली. नाशिक रेल्वे स्थानकावर चार महिने राहिल्यानंतर ती मनमाडला गेली. या काळात ती भीक मागून स्वत:चे पोट भरत होती. मनमाड रेल्वे स्थानकावर ती राहत असताना तिला सचिन नावाचा मुलगा भेटला. हा मुलगा मनमाड रेल्वे स्थानकावर पाणी विकतो. त्यानेही या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आपली चूक झाली असून आपण जिथे जिथे जाऊ तिथे आपल्याला हा त्रास सहन करावा लागत असल्याचे तिच्या लक्षात आले. बाहेरच्या जगाचा निर्दयी आणि निष्ठूर अनुभव तिला आला होता. सततची उपासमार, उघड्यावरचे राहणे, भीक मागून जगणे या सर्व परिस्थितीमुळे तिला आई-वडिलांची आठवण येऊ लागली. धीर करून तिने २४ सप्टेंबरला एसटीडी बुथवरून वडिलांना फोन केला. मी मनमाड रेल्वे स्थानकावर असल्याचे तिने वडिलांना सांगितले.
मिरज लोहमार्ग पोलिसांना घेऊन तिचे वडील २७ सप्टेंबरला मनमाड रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्या वेळी ही मुलगी फलाट क्रमांक ४ वर बसलेली मिळून आली. अंगावरचे कपडे आणि तिची अवस्था पाहून वडिलांना धक्काच बसला. शद्ब फुटत नसल्याने तिला उराशी धरले. वडिलांच्या स्पर्शाने तिच्याही अश्रूंचा बांध फुटला. आपल्यावर झालेले अत्याचार तिने वडिलांसह पोलिसांच्या महिला सहाय्य कक्ष आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर कथन केले. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तो पुणे लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

Post a Comment

 
Top