0
अहमदनगर: पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचे दुःखद निधन, राजकीय क्षेत्रात हळहळ

पाथर्डी- पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार राजीव राजळे (वय- 47) यांचे मुंबईत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना शनिवारी रात्री बाराच्या दरम्यान ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून राजळे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, राजळे यांच्यासारख्या तरूण, तडफदार नेत्याचे ऐन तारूण्यात निधन झाल्याने राजकीय क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सायंकाळी ४:३० वाजता कासार पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मूळ काँग्रेसी विचाराचे राहिलेल्या राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे सध्या भाजपच्या आमदार आहेत. तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे होते. एक संवेदनशील साहित्यप्रेमी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान यापासून आंतरराष्ट्रीय घडामोडी ते अवकाश तंत्रज्ञान या सर्व विषयामध्ये रुची आणि वाचन असलेले राजळे कदाचित एकमेव लोकप्रतिनिधी राहिले असावेत. कार्यकर्त्यांत ते 'राजाभाऊ' नावाने लोकप्रिय होते.
दलाई लामांपासून ते बांगलादेशच्या बचत गटाच्या प्रवर्तकांपर्यंत तसेच थोर साहित्यकांपासून सामान्यमानासापर्यंत अतिशय स्नेहपूर्ण सबंध जपणारा हा युवा नेता अकाली निघून गेल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. पाथर्डी सारख्या मागास व दुष्काळी तालुक्याच्या ठिकाणी साहित्य संमेलन भरविणे, ग्रंथालय चळवळ रुजविण्याचा प्रयत्न करणे, कविसंमेलन आयोजित करणे अशा साहित्य संगीत कला संस्कृती या बाबींचा रसिक असलेला आणि अतिशय निधड्या छातीने भल्याभल्या दिग्गजांशी राजकारणात दोन हात करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

 
Top