
मुंबई - आपल्याला एखाद्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर प्रेक्षकांची आपल्याकडून अपेक्षा वाढते, हे जरी खरं असलं तरी त्यासाठी आशयघन सिनेमाची निर्मिती करण्याचे धाडस कुणी केल्याशिवाय ते पूर्ण होत नाही, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी व्यक्त केली. ६ ऑक्टोबर पासून त्यांचा 'हलाल' हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद..
शिवाजी पाटील सांगतो कि, "खरंतर धग सिनेमासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मी लगेचच 'हलाल'साठी तयारी केली होती. अनेक निर्मात्यांना भेटलो पण प्रकरण पुढे सरकत नव्हते. याच दरम्यान मी '३१ ऑक्टोबर' हा हिंदी सिनेमा करत होतो. ज्यात प्रितम कागणे देखील काम करत होती. सोबत तिचा भाऊ अमोल कागणे देखील माझ्यासोबत होता. दोघांना हलालची गोष्ट ऐकवली. त्यांना खूप भावली आणि जराही विलंब न करता अमोलने या सिनेमाची निर्मिती करण्याचे धाडस दाखवले. मनापासून सांगायचं तर 'हलाल' सिनेमाचे बीज माझ्या गावातच मला मिळाले होते. जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याश्या खेडगावात मी लहानाचा मोठा झालोय. तिथे गावात अनेक गरीब मुस्लीम कुटुंब मी पाहिले आहेत, त्यांच्या परंपरा, सण सर्व काही जवळून पाहिले होते."
विषय कसा सुचला याबद्दल शिवाजीने सांगितले की, "राजन खान यांच्या एका कथा संग्रहात 'हलाल'ची कथा मी वाचली आणि त्यावर काम सुरु केले. हलाल सिनेमा, ट्रिपल तलाक पद्धतीवर कडाडून भाष्य करणारा सिनेमा आहे. आज जरी सरकारने त्यावर ठोस पाउलं उचलली असली तरी दुर्गम भागात अजूनही अशा घटना घडत आहेत, ज्याकडे सिनेमा लक्ष वेधतो. ज्याप्रकारे हिंदू धर्मात सती जाणे, बालविवाह अशा परंपरा बंद झाल्या तश्या मुस्लीम धर्मातील ट्रिपल तलाक बद्दल आम्ही विचारपूर्वक भाष्य केले आहे. या तलाकमुळे स्त्रीची होणारी वेदना आम्ही दर्शवली आहे."
सिनेमाच्या कथानकाविषयी शिवाजी पाटील पुढे सांगतो कि, "एका ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब मुस्लीम कुटुंबाची ही गोष्ट आहे. कुटुंबात तीन मुली आहेत, ज्यातल्या मोठ्या मुलीला तलाकचा सामना करावा लागतो तेव्हा तिच्यावर आणि कुटुंबावर काय परिणाम होतो हे दाखवण्यात आले आहे. सिनेमात प्रितम कागणे हिने मुख्य नायिकेची भूमिका लीलया पेलली आहे, तिच्यासोबत प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, विजय चव्हाण यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. मराठी सिनेमाच्या विषयातील नाविन्य आणि संवेदनशील अभिनय यासाठी प्रत्येक मराठी प्रेक्षकाने हलाल हा सिनेमा नक्की बघावा."
Post a Comment