0
अण्णा हजारे दिल्लीतील राजघाटवर, आज लाक्षणिक उपोषण, आंदोलनाचे रणशिंगही फुंकणार

नवी दिल्ली/मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सकाळी महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने (२ ऑक्टोबर) राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळी जाऊन आदरांजली वाहिली. दरम्यान, अण्णा आज नवी दिल्लीतील आपल्या आगामी आंदोलनाची घोषणा करणार आहेत. त्याआधी राजघाटवर ते लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने ते आंदोलनाची घोषणा करणार आहेत. सोबतच मोदी सरकारला यासाठी पुढील तीन महिन्यांचा कालावधी अण्णांकडून दिला जाईल. या दरम्यान काहीही ठोस पावले उचलली नाहीत तर अण्णा नव्या वर्षात म्हणजे जानेवारी 2018 पासून दिल्लीत मोठे जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे कळते.
अण्णा हजारे हे मागील तीन वर्षांपासून पंतप्रधान मोदींना सातत्याने पत्र पाठवून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी करत आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात येते. पंतप्रधान मोदी यांचे भाषण वेगळे कृती वेगळी, अशी टीकाही अण्णांनी केली असून पंतप्रधान मोदी यांना देशातील गैरप्रकार थांबवायचेच नाहीत असा अर्थ यातून निघत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
लोकपाल शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, अशी मागणी करत अण्णा थेट दिल्लीतूनच आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत. या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

 
Top