
जमशेदपूर- दारू आणि दारूसारख्या वाईट व्यसनांविरोधात आवाज उठवणाऱ्या ५५ वर्षीय आदिवासी महिला सालगो बेसरा यांचा संघर्ष चर्चेत आला आहे. झारखंडच्या चाइबासा जिल्ह्यात सालगे गुडाबांदा पोलिस ठाणे क्षेत्रातील वर्षाडीह टोलाची रहिवासी सालगो अनेक वर्षांपासून दारूबंदीसाठी संघर्ष करत आहे. गावगुंडांना तिचे काम न देखवल्याने त्यांनी तिला हडळ ठरवत गाव सोडण्यास सांगितले. मात्र, यानंतरही सालगो पाय रोवून उभी आहे.
यात कहर म्हणजे गावातील गुंडांनी सालगोचा पती गोरा बेसराला आपल्या बाजूने वळवले. पतीच ग्रामस्थांच्या भाषेत बोलू लागल्यावर महिला कोसळली. दोन महिन्यांपासूनची निंदानालस्ती सहन न झाल्याने सालगो अखेर शनिवारी पोलिस ठाण्यात गेली. ठाणे प्रभारी कुलदीपकुमार यांनी तूर्त एफआयआर दाखल करणार नसल्याचे सांगितले. गुन्ह्याची प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी कुलदीपकुमार सालगोसोबत तिच्या घरी गेले. ग्रामस्थांना बोलावले व त्यांच्यासमोर सालगोच्या घरातील अन्न सेवन करून पाणी प्यायले. ग्रामस्थांना म्हणाले, ही हडळ असेल तर आधी मी मरेन. ही अंधश्रद्धा आहे. त्यांनी ग्रामस्थांना इशारा दिला की, सालगोचा छळ केल्यास कोणाचीही गय नाही. विशेष म्हणजे, झारखंडमध्ये आदिवासी महिलांना हडळ संबोधत छळ केल्याची प्रकरणे सतत घडतात. बहुतांश प्रकरणांत या महिलांची हत्या होते. १६ सप्टेंबरला गुडाबांदामध्ये एका युवकाने चार तरुणांना घेऊन काकू व चुलत बहिणीला हडळ ठरवत त्यांची हत्या केली होती.
लोक म्हणतात, सालगोमुळे गावात वाघ-अस्वल येतात
सालगोमुळे गावात वाघ व अस्वल येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ती वाघ व अस्वल होऊन लोकांना त्रास देत आहे. मुले आजारी पडत आहेत. मान्सूनदरम्यान डझनभर मुले आजारी पडल्यामुळे लोकांनी आणखी रोष व्यक्त केला.
Post a Comment