0
मोदींना क्लीन चिटविरोधी माजी खासदार जाफरी यांच्या पत्नीची याचिका फेटाळली

अहमदाबाद- २००२ च्या गुजरात दंगल प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि अन्य दोघांना देण्यात आलेल्या क्लीन चिटविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका गुरुवारी गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दंगलीत मारले गेलेले काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जकिया जाफरी आणि तिस्ता सेटलवाड यांच्या “सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’ या स्वयंसेवी संस्थेकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

दंगल ही कटानुसार घडली होती, हा दावा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला नव्हता, असे सांगत न्यायमूर्ती सोनिया गोकानी यांनी याचिका फेटाळून लावली. न्या. गोकानी म्हणाल्या, “संजीव भट्ट यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळून लावले आहे. त्यामुळे ही दंगल मोठ्या कटाचा भाग असल्याच्या आरोपाची याचिका फेटाळली जात आहे. मात्र, यास याचिकाकर्ते वरिष्ठ पीठात आव्हान देऊ शकतात.’ विशेष चौकशी समितीने (एसआयटी) ८ फेब्रुवारी २०१२ रोजी नरेंद्र मोदी यांच्यासह ५९ लाेकांना या प्रकरणात क्लीन चिट दिली होती. जकिया यांनी याविरोधात न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. मात्र, त्यांनी याचिका फेटाळल्याने त्या गुजरात उच्च न्यायालयात गेल्या.

या प्रकरणात मोदी आणि अन्य लोकांना गुन्हेगारी कटात सामील असल्याच्या आरोपाखाली आरोपी बनवावे आणि संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीत चौकशी झाली होती. हे कट मोठ्या कटाचा भाग असल्याच्या संदर्भाची चौकशी करण्याची गरज नसल्याचा निकाल कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. दरम्यान, हिंदूंना त्यांचा राग काढू द्या, असे मोदी यांनी त्यांच्या घरी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले होते.

Post a Comment

 
Top