0
Mumbai : Shivsena chief Uddhav Thackeray on 6 MNS corporators entering in partylatest update

मुंबई : घोडेबाजारीचा आरोप गाढवांनी करु नये, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप खासदार किरीट सोमय्या यांना लगावला आहे. शिवसेनेने तीन कोटी रुपये मोजून नगरसेवक विकत घेतल्याचा सनसनाटी आरोप सोमय्यांनी केला होता.
मनसेच्या सहा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानावर त्यांनी हे शिवबंधन बांधलं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सहा जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आल्याचं उद्धव म्हणाले.
अर्चना भालेराव (वॉर्ड 126), परमेश्वर कदम (वॉर्ड 133), अश्विनी मतेकर (वॉर्ड 156), दिलीप लांडे (वॉर्ड 163), हर्षल मोरे  (वॉर्ड 189), दत्ताराम नरवणकर यांनी सेनाप्रवेश केला.
मराठी माणसाचा पराभव जिव्हारी
मुंबईत मराठी माणसाचं हित शिवसेनाच जपते. काल मराठी माणसाचा पराभव आमच्या जिव्हारी लागला. मुंबईतून मराठी महापौर हटवण्याची भाषा भाजपने केल्याचं आपल्याला रुचलं नाही. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रातिनिधीक प्रतिक्रिया सेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी व्यक्त केली.
तर ते मित्रपक्ष कसले?
आमचं बळ वाढल्याने त्यांच्या पोटात मुरडा येत असेल, तर ते मित्रपक्ष कसले? असा जळजळीत सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. भाजप आम्हाला मित्रपक्ष मानत असेल, तर आमचं बळ वाढल्याने त्यांना पोटदुखी कशाला? असंही उद्धव म्हणाले.
भांडुपची पोटनिवडणूक सहानुभूतीने जिंकली
इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, असं कसं, असा टोलाही फोडाफोडीच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी हाणला. फोडाफोडी तेव्हा झाली होती, आज त्या सहा जणांची घरवापसी झाली आहे, असंही उद्धव म्हणाले. भांडुपची पोटनिवडणूक भाजपने नाही, तर सहानुभूतीने जिंकली, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
कोणाला फटका द्यायचा म्हणून त्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेतलं नाही, त्यांनीच शिवसेनाप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. शिवसेना-भाजपाच्या भांडणाचा परिणाम मनसेला झाला असं नाही. हे सगळे मनापासून शिवसैनिक होते, ते परत आले.आम्ही महापालिकेत भाऊ आहोतच, भाजपाला कल्पना नव्हती की मातोश्रीवर त्यांचा भाऊ राहतो, असंही उद्धव म्हणाले.
भाजपचा परतीचा प्रवास
जनतेच्या भावनेचा आदर केला पाहिजे. मी काँग्रेसचा आणि अशोक चव्हाणांचं मनापासून अभिनंदन करतो. जनतेचा कौल स्वीकारला पाहिजे, असं मतही उद्धव यांनी नांदेडच्या निकालावर व्यक्त केलं.
जर भाजपची लाट संपली नसती तर भाजपला दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागले नसते. त्यामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
एका दिवसात सेना इतकी जमवाजमव करत असेल, तर आमच्या ताकदीचा अंदाज आलाच असेल, अशी मिश्कील टिपणीही उद्धव ठाकरेंनी केली

Post a Comment

 
Top