0


मुंबई:-आपल्या अभिनयामुळं सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री विद्या बालन ही आता तिच्या एका जुन्या प्रेमप्रकरणामुळं चर्चेत आली आहे. विद्यानं स्वत:च या चर्चेला तोंड फोडलं आहे. 'माझं एका तरुणावर प्रेम होतं. पण माझ्या बहिणीसाठी मला या प्रेमाचा त्याग करावा लागला,' असा गौप्यस्फोट तिनं केला आहे.

अभिनेत्री नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या कार्यक्रमात विद्यानं तिच्या खासगी जीवनातील काही गुपितं उघड केली. 'प्रेम प्रकरणाबद्दल विचाराल तर मी स्वत:ला आजही एक शहीद समजते. माझं एका तरुणावर प्रेम होतं. मला तो आवडायचा. पण त्या तरुणाला माझी बहीण आवडायची. त्या दोघांमध्ये डेटिंगही सुरू होतं. मला कळलं तेव्हा मी मनावर दगड ठेवून माघार घेतली,' असं विद्यानं सांगितलं.

विद्या बालनच्या आगामी 'तुम्हारी सुलू' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'यू' अर्थात युनिव्हर्सल सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. त्यामुळं आता तुम्हारी सूलू पाहण्यासाठी वयाच्या बंधानाची कोणतीही अट राहिली नाही. सुरेश त्रिवेणी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विद्या ही सुलोचना नामक रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसेल. अभिनेता मानव कौल तिच्या पतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. येत्या १७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात विद्यानं साकारलेल्या रेडिओ जॉकीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळं तिच्या नव्या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.

Post a Comment

 
Top