0


पाटणा -  बिहारच्या बलियावान गावामध्ये बलात्काराचे एक प्रकरण समोर आले आहे. क्रूरतेचा कळस गाठणा-या या घटनेने दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करुन दिली. बलात्काराचा प्रयत्न करताना आरोपींनी महिलेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड घुसवला. या लैंगिक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा गुरुवारी रुग्णालयात मृत्यू झाला. पाटण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बलियावान गावामध्ये बुधवारी ही घटना घडली. 
पीडित महिला 35 वर्षांची असून चार मुलांची आई आहे. बुधवारी पीडित महिला शेतातून घरी परतत असताना आरोपींनी तिला गाठले व जबरदस्ती सुरु केली. बलात्काराचा प्रयत्न करताना आरोपींनी लोखंडी रॉड या महिलेच्या गुप्तांगामध्ये घुसवला. महिला गंभीर जखमी झाल्यानंतर दोन्ही आरोपी तिला त्याच अवस्थेत सोडून घटनास्थळावरुन पसार झाले. दोन आरोपींपैकी एकाची ओळख पटली असून, एका आरोपीचे नाव धीरज आहे. 
पीडित महिलेला शेतात जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर गावकरी तिला घरी घेऊन आले. बेशुद्ध होण्यापूर्वी या महिलेने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे नव-याला आणि कुटुंबाला सांगितले. पीडित महिलेनेच हल्लेखोराचे नाव धीरज असल्याचे सांगितले. तिला बुधवारीच पाटणा मेडीकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी तिचा मृत्यू झाला. 
महिलेला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रॉडमुळे तिच्या शरीराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. तिच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु होता. आम्ही शस्त्रक्रिया करण्याआधीच अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले. आरोपी धीरज पीडित महिलेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. त्याची पीडित महिलेबरोबर ओळख होती. 
नव-याला सोडून देण्यासाठी धीरज पीडित महिलेवर दबाव टाकत होता. पण पीडित महिला ऐकत नसल्याने त्याने बदल्याच्या भावनेतून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.आरोपींनी पीडित महिलेवर शारीरीक जबरदस्तीचा प्रयत्न केला. पण पीडित महिला ऐकत नसल्याने त्यांनी लोखंडी रॉडने हल्ला केला अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघा आरोपींपैकी एकाने महिलेचे हात बांधले. दुस-याने तिच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड घुसवला. पोलिसांनी धीरजला अटक केली असून दुस-या आरोपीचा शोध सुरु आहे. 

Post a Comment

 
Top