0
राणे उद्धवविरोधातील भाजपचे हत्यार?...तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार?

मुंबई- नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केल्यानंतर आता त्यांच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे. भाजपने नारायण राणेंच्या पक्षाला एनडीएत सामील होण्याबाबत कोणतेही निमंत्रण दिले नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. सोबतच राणे एनडीएमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे असे वक्तव्य केल्याने याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे, फडणवीस यांनी राणे प्रकरणावर शांत राहणेच पसंत केले आहे. मात्र, भाजपमधील नेत्यांची राणेंच्या एनडीए प्रवेशाच्या धसक्याने धावाधाव सुरु झाली आहे. तर, फडणवीसांनी राणेंना मानाचे पान देत मंत्रिमंडळात घेतले तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दहा-पंधरा दिवस राणेंचे पान चवीने चघळले जाणार हे निश्चित आहे. काँग्रेसमधून बाहेर पडत नारायण राणे यांनी रविवारी 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' या नव्या पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेच्या घोषणेला एक तासही उलटत नाही तोपर्यंत भाजपने त्यांना एनडीएत येण्याचे आमंत्रण दिल्याची बातम्या समोर आल्या. इतकेच नव्हे तर राणेंना लवकरच होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यासारखे महत्त्वाचे मंत्रिपद देणार असल्याची चर्चा सुरु झाली. या चर्चा सुरू होताच शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली.
शिवसेना आणि राणे यांच्यातील 36 चा आकडा सर्वश्रुत आहे. अशावेळी फडणवीसांना राणेंना मानाचे पान दिले तर मंत्रिमंडळात राणेंच्या मांडीला मांड लावून बसण्याची शिवसेनेची तयारी नाही. त्यांच्याविरोधात संघर्ष केला किंवा सुरु आहे त्यांच्यासोबत बसणे राजकीय शहाणपणाचे नाही याची जाण शिवसेनेला आहे. त्यामुळेच राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास शिवसेना सरकारमधूनच नव्हे तर एनडीएतून बाहेर पडू शकते असे बोलले जात आहे.

Post a Comment

 
Top