0
मेरठ - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार संगीत सोम पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत आले आहेत. ते म्हणाले, 'मुघल शासक बाबर, अकबर आणि औरंगजेबाने भारतीयांवर राज्य केले, त्यांचे नाव इतिहासातून काढून टाकले पाहिजे.' उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालाचे नाव काढून टाकले आहे. त्यावर होत असलेल्या टीकेला जाहीर भाषणातून उत्तर देताना सरधना येथील आमदार सोम म्हणाले, 'कशाचा आणि कोणता इतिहास. ताजमहाल बांधणाऱ्याने स्वतःच्या पित्याला कैद केले होते आणि अनेक हिंदूंचा सर्वनाश केला होता.' मात्र सत्य हे आहे की मुघल शासक शहाजहानने पत्नीच्या आठवणीत, तिच्या प्रेमाखातर ताजमहाल बांधला होता. आणि आयुष्याच्या अखेरच्या दिवसात त्याचा मुलगा औरंगजेबाने त्याला तुरुंगात डांबले होते. सोम यांच्या वक्तव्याचा AIMIM प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला आहे.
मोदी लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवणार नाहीत का?
तिरकस टिप्पणी करताना ओवेसी म्हणाले, 'ताजमहाला ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीतून काढण्यासाठी सोम यांनी यूनेस्कोमध्ये गेले पाहिजे.' ताजमहालासोबतच लाल किल्लाही गद्दारांनीच बनवला होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवणे आता बंद करणार, आहेत का? असा सवालही ओवेसींनी विचारला आहे.
वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे आमदार संगीत सोम यांच्या हस्ते मेरठमधील सिसोली येथे रविवारी सायंकाली राजा अनंगपाल तोमर यांच्या प्रतिमेचे आनावरण करण्यात आले. यावेळी सोम म्हणाले, आता भाजपचे सरकार आहे. ते देशाच्या इतिहासातून बाबर, अकबर आणि औरंगजेबाच्या कलंक कथा काढण्याचे काम करत आहेत. देशाचा इतिहास बिघडलेला होता, त्याला सुधारण्याचे काम भाजप करत आहे. इतिहासात आक्रमण करणाऱ्यांचा गौरवशाली (glorified) उल्लेख आहे.
शिवाजी महाराज, महाराणा प्रताप शाळेमधून शिकवले पाहिजे
- संगीत सोम म्हणाले, खरे महापुरुष तर शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप सारखे लोक होते. त्यांच्या आयुष्याबद्दल शाळा, महाविद्यालयातून शिकवले गेले पाहिजे. अनेक हिंदू राजे असे आहेत ज्यांचा इतिहासाच्या पुस्तकात उल्लेखही नाही. भाजप सरकार अशा राजांच्या वीरकथा आणि बलिदान गाथांचा सन्मान करेल.
ज्याने ताजमहाल बांधला, त्याने हिंदूंचा सर्वनाश केला
- आमदार सोम म्हणाले, 'ऐतिहासिक स्थळांच्या यादीतून ताजमहाल वगळण्यात आले, याचे काही जणांना फार दुःख झाले. हा कसा इतिहास आणि कोणता इतिहास आहे. ज्याने पित्याला तुरुंगात डांबले होत आणि ताजमहाल बांधणाऱ्याने उत्तर प्रदेश आणि भारतातील अनेक हिंदूंचा सर्वनाश केला, याला तुम्ही इतिहास म्हणता.'
कोण आहेत संगीत सोम?
- संगीत सोम भाजपचे आमदार आहेत. सरधना येथून दोनवेळा ते भाजपच्या तिकीटावर विधानसभेवर विजयी झाले आहेत. 
- 2013 मध्ये मुझफ्फरनगर येथे दंगल झाली होती. या दंगलीचे तेही एक आरोपी आहेत.
सोम यांचे वादग्रस्त वक्तव्य 
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळात सोम यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले होते. 
- 19 ऑगस्ट 2016 ला संगीत सोम म्हणाले होते, 'येथील भांडण हे हिंदूस्थान - पाकिस्तान सारखे आहे. एकीकडे हिंदूस्थान आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान. तुम्हाला काय करायचे याचा निर्णय तुम्ही घ्या.'
पर्यटकांसाठीही ताज बंद करणार का - ओवेसी
ओवेसींनी सोम यांच्या वक्तव्यासोबतच ताजमहालला राज्याच्या पर्यटन स्थळांच्या यादीतून काढण्यावरुनही राज्य तसेच केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, 'मोदी आणि योगी देश-विदेशातील पर्यटकांना ताजमहाल पाहाण्यासही रोखणार आहेत का? हैदराबाद हाऊसही गद्दारांचीच देण आहे, मग मोदी तिथे विदेशी पाहुण्यांचे स्वागत करणार नाहीत का?' 
- ओवेसी म्हणाले, भाजप जीएसटी, नोटबंदी, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांनी त्रस्त आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करत आहे. जनतेने गुजरात निवडणुकीत भाजपला धडा शिकवला पाहिजे.

Post a Comment

 
Top