0
निधी असूनही जळगाव जिल्ह्यातील 38 हजार मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

जळगाव - शासनाच्या नियोजनाअभावी कनिष्ठ विद्यालये, महाविद्यालयांमधील मागासवर्गीय विद्यार्थी सन २०१६-१७ या वर्षाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. राज्यात हे काम पाहणाऱ्या खासगी संस्थेचा करार संपल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला अाहे. जळगाव जिल्ह्यातील ३८ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली असून या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या; पण त्यांचे नियोजन नसल्यामुळे अनेक योजना अडकून पडल्या आहेत. इयत्ता अकरावी ते विविध शाखेत प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते.
यापूर्वी वर्षातून दोन टप्प्यांमध्ये ही शिष्यवृत्ती विद्यार्थी आणि महाविद्यालयांना देण्यात येत होती. मात्र, गेल्या वर्षातील शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दीड वर्ष उलटण्यात आले तरी अद्यापपावेतो देण्यात आलेली नाही. समाज कल्याण कार्यालयाकडून वेगवेगळी कारणे सांगून विद्यार्थी आणि महाविद्यालयांना चकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रश्न केवळ जळगाव जिल्ह्याचा नसून राज्यभरातील विद्यार्थ्यांचा आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्तीची रक्कम जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेली आहे. मात्र, आजपर्यंत जी संस्था हे काम पाहत होती, त्या संस्थेचा करार गेल्या वर्षी पूर्णत्वास आला. त्यामुळे शिष्यवृत्ती वाटपाचे काम बारगळल्याचे कारण पुढे आले आहे.

मॅन्युअली बिले काढण्याचे काम 
शासनाकडून जळगाव जिल्ह्यातील ३८ हजार विद्यार्थ्यांची यादी समाजकल्याण विभागाला प्राप्त झाली असून त्या विद्यार्थ्यांचे मॅन्युअली बिले तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. याआधी खासगी संस्थेकडून हे काम केले जात होते. जळगाव जिल्ह्यात ४३ लाख रुपयांची शिष्यवृत्ती वाटप केली जाणार आहे. ही रक्कम गेल्या वर्षातील विद्यार्थ्यांची आहे. शिष्यवृत्ती लांबल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धी तर एसस्सी आणि एनटीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क माफ केले जाते.
यंदा आधार लिकिंगचे काम 
खासगीसंस्थेचा कराराचे नूतनीकरण केल्यामुळे यंदापासून शासनाने शिष्यवृत्ती वाटपासाठी महाडीबीटी हे पोर्टल सुरू केले आहे. मात्र, त्यावर विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करायला अनेक अडचणी येत आहे. तसेच यंदा विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रांची पडताळणी करून आधार लिंकही करावे लागणार आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी कनेक्टिव्हीची समस्या महाविद्यालयांना येत असल्याच्या तक्रारी संस्थाचालकांनी केल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे मॅन्युअलीबिले काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे ८० ते ८५ हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना मार्चमध्ये शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे. उर्वरित ३८ हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे बिले काढण्याचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण होणार आहे. खासगी संस्थेचा करार संपल्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम वाटपाच्या कामाला विलंब झाला आहे.

Post a Comment

 
Top