0
सख्खा भाऊच निघाला चोर, 36 तासांत चोरीचा छडा

वावी- मिठसागरे येथील घरफोडीत चोरी केलेल्या दाेन लाख ४५ हजार रुपयांसह संशयितास वावी पोलिसांनी ३६ तासांत ताब्यात घेतले. चोरी झालेल्या घरमालकाच्याच सख्ख्या भावाने घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे.

पांगरी-मिठसागरेरोडवरील संदीप कासार यांच्या घराच्या खिडकीचे गज वाकवून लोखंडी पेटीत ठेवलेले दाेन लाख ४५ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. पेटीतील दागिन्यांना हात लावता केवळ पैशाचीच चोरी झाल्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. सहायक निरीक्षक रणजित आंधळे, हवालादर मुख्तार सय्यद, रामनाथ देसाई, योगेश शिंदे, राजेंद्र केदारे, संदीप शिंदे, उमेश खेडकर, प्रकाश उंबरकर, नितीन जगताप, दत्तात्रय दराडे आदींनी घटनेचा तपास केला. संदीपचा सख्खा भाऊ बाळू चोरीच्या अगोदर तुळजापूर येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगून गेला होता. मात्र, तो कोपरगावमार्गे नांदेडला गेल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांचे पथक नांदेड येथे गेले होते. परंतु, बाळू कासार हा घरी परतल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

चोरी केलेले दाेन लाख ४५ हजार रुपये घराजवळच्या विहिरीवरील मातीच्या ढिगाऱ्यातून काढण्यात आले. संदीप कासार यांनी दीड महिन्यापूर्वी शेळ्या विकून एक लाख ८५ हजार तर आईकडील ६० हजार असे दाेन लाख ४५ हजार रुपये पेटीत ठेवले होते.

Post a Comment

 
Top