0
लष्कराच्या मदतीने बांधणार 23 जणांचे बळी घेणारा एलफिन्स्टन ब्रिज, मुख्यमंत्र्यांची घोषणा एलफिन्स्टन स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर येथील फूट ओव्हर ब्रिजसह एकूण 3 ब्रिज लष्कराच्या मदतीने बांधले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह विनोद तावडे यांचीही उपस्थिती होती.
एलफिन्स्टनसह आंबीवली आणि करी रोड स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजचे कामही याबरोबर होणार असल्याची माहिती यावेळी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर लगेचच संरक्षण मंत्रालयाशी बोलून याबाबत मागणी केली होती अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
एलफिन्स्टन दुर्घटना ही फार मोठी होती. त्यामुळे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कामासाठी लष्कराची मदत घेतली जाणार असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. लष्करातील इंजिनीअर्सच्या मदतीने आणीबाणीच्या स्थितीमध्ये अत्यंत कमी वेळामध्ये पूल किंवा इतर गरजेची बांधकामे पूर्ण केली जातात. त्यामुळे हा पूल बांधण्यासाठी लष्कराची मदत घेतली जाणार आहे.
एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता तर 39 प्रवासी जखमी झाले होते.

Post a Comment

 
Top