0
ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसली; 2 ठार 18 जखमी, संतप्त जमावाने बस पेटवली

कोल्हापूर-ताबूत विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूर महानगरपालिका परिवहनची (केएमटी) बस घुसून 2 जण ठार झाले तर 18 जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तानाजी भाऊ साठे (वय 30) आणि सुजल भानुदास अवघडे (वय 15) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींना तात्काळ येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रात्री 8 च्या सुमारास हा अपघात शहरातील गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी येथे झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने केएमटी बस पेटवून दिली. या घटनेने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. केएमटी बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोल्हापूर शहरात आज सायंकाळी ताबूत विसर्जन मिरवणूक होती. या मिरवणुकीतील काही पंजे वाद्यांच्या गजरात पंचगंगा नदीकडे निघाले होते. त्यावेळी शिवाजी चौकाकडून गंगावेशीकडे जात असलेल्या केएमटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने ही बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसली. या दुर्दैवी घटनेत 2 जणांना जीव गमवावा लागला आणि 18 जण जखमी झाल्याने तीन हजारहून अधिक लोकांचा जमाव घटनास्थळी जमला आणि त्या जमावाने दगडफेक करून बसची तोडफोड केली आणि ही बस पेटवून दिली. यावेळी दुर्घटनेची माहिती मिळाल्याने घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली. परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनल्याने जलद कृती दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

 
Top