
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवरील फेरीवाल्यांना येत्या 15 दिवसात हटवा. जर रेल्वेने ही कारवाई केली नाही, तर सोळाव्या दिवशी माझी माणसं म्हणजे मनसैनिक त्यांना हटवतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला.
राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने आज ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलं. यानंतर राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं.
यावेळी चर्चगेटजवळ राज ठाकरे यांच्या भाषणासाठी दोन ट्रक आणले होते. त्यावरच उभं राहून राज ठाकरे यांनी भाषण केलं.
15 दिवसांचा अल्टिमेटम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. रेल्वे स्टेशन परिसरातले फेरीवाले येत्या 15 दिवसात हटवले नाही, तर मनसे रस्त्यावर उतरुन मनसे स्टाईलनं फेरीवाल्यांना हटवेल असा इशारा राज यांनी यावेळी दिला.
बुलेट ट्रेनला विरोध कायम
यावेळी राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध कायम असल्याचं ठणकावून सांगितलं. सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केल्याने त्यांना रेल्वेमंत्रीपदावरुन हटवल्याचा आरोप राज यांनी केला.
तसंच बुलेटट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले, असं राज म्हणाले.
मूठभर लोकांचं कर्ज देशाने का भरायचं?
बुलेट ट्रेनचा लाभ काही लोकांनाच होणार आहे. तो होईल की नाही याबाबतही शाश्वती नाही. मोदींचा जुना व्हिडीओही त्याबाबत सांगून गेला. मग मूठभर लोकांसाठी बुलेट ट्रेनच्या कर्जाची परतफेड संपूर्ण देशाने का करायची? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
मोदींनी फसवलं
याशिवाय राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदी आणि भाजपने देशातल्या जनतेला फसवलं, त्यामुळं मोदी सरकारच्या सगळ्या चुकीच्या धोरणांना विरोध दर्शवा, असं राज यांनी उपस्थितांना आवाहन केलं.
मोदी खोटारडे
व्यक्ती म्हणून मोदींशी देणंघेणं नाही, पण ते आधी एक बोलत होते, आता एक बोलत आहेत. लोक सांगतात की मोदींचा आवाज ऐकायला आला की टीव्ही बंद करावासा वाटतो. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान पाहिला नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
न्यायाधीश, संपादकांना आवाहन
यावेळी राज ठाकरे यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांच्या न्यायाधीशांना, तसंच देशभरातील संपदकांना आवाहन करुन, सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याची मागणी केली.
राज म्हणाले, “न्यायाधीशांना विनंती आहे, सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नका, सरकार बदलत असतं, योग्य निर्णय घ्या”
तर माध्यमांनी आणि संपादकांनी चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
Post a Comment