
सोलापूर (पंढरपूर)-महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचा 11 डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक विचार करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राणेंनी काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर एनडीएला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात येईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तसेच हिवाळी अधिवेशनापूर्वी राणेंना मंत्रिमंडळात घेण्यात येईल, असे संकेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तर आता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 11 डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल, असे सांगितले आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त पार पडलेल्या शासकीय महापूजेनंतर त्यांनी ही माहिती दिली. राणेंच्या प्रवेशाला शिवसेनेचा विरोध आहे. पण तेही नक्कीच मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी मंत्री खडसे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केले. खडसेंच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यातील बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. मुख्यमंत्रीही याबाबत सकारात्मक आहेत, असे ते म्हणालेत.
Post a Comment