0

लैंगिक शोषणाच्या घटनांनी राज ठाकरे उद्विग्न, शैक्षणिक संस्थांना काळजी घेण्‍याचे आवाहन


औरंगाबाद - देशाचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे त्यांच्याच संस्थेत लैंगिक शोषण झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. दुर्दैवाने सरकार याबाबत गंभीर नसल्यामुळे संस्थांच्या प्रमुखांनीच विद्यार्थ्यांचे पालक व्हावे, असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. एका खुल्या पत्राद्वारे केलेल्या आवाहनाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना शुक्रवारी (१५ सप्टेंबर) सोपवले. कुलगुरूंनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
खुल्या पत्रात ठाकरे म्हणतात, ‘महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी आपल्या मुला-मुलींप्रमाणेच समजतो. संस्थांच्या प्रमुखांनीदेखील सर्वांना आपल्या मुुलांप्रमाणेच समजावे, असे वाटते. शिक्षक-शिक्षकेतरांनी मनापासून अशीच भूमिका घेतली तर कोणत्याही संस्थेत विद्यार्थ्यांचे काहीच नुकसान होणार नाही. पालकांनी मोठ्या विश्वासाने त्यांना आपल्याकडे सोपवलेले असते. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये आपणच पालक व्हावे, किंबहुना सर्व विद्यार्थ्यांकडेही त्याच भावनेतून पाहावे. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न आहे, याची मला जाणीव आहे.

कुठलीही सबब सांगता विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. असे झाले तर मनसे, स्थानिक पदाधिकारी सदैव आपल्या पाठीशी ठामपणे राहतील’, असे आश्वासन राज यांनी दिले आहे. या पत्रात राज यांनी त्यांच्या मेल आयडीवर आणि पक्षाच्या दूरध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. कुलगुरूंना निवेदन देणाऱ्यांमध्ये सतनामसिंग गुलाटी, गौतम आमराव, गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, विशाल आमराव, आनंद भिसे, आनंद खरात, राजदीप सोनवणे, संकेत शेटे, अशोक पवार, किशोर साळवे आणि राजू थोरात आदींचा समावेश होता. राज ठाकरे यांचे खुले पत्र निवेदन म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंना सादर केले. या वेळी गौतम आमराव, गजन गौडा, सतनामसिंग गुलाटी, राजू थोरात.

Post a Comment

 
Top