0
चरित्र्यावर संशय घेत भाच्यांनी केली आत्याची खांडोळी; बदनामीमुळेच केला खून

माजलगाव- आत्याच्या वाईट वर्तणुकीमुळे समाजात बदनामी होत असल्याच्या भावनेतून दोन भाच्यांनी आत्याची झोपेत असताना कुऱ्हाडीचे घाव घालून खांडोळी केली. दोघेही नंतर ग्रामीण पोलिसांत हजर झाले. माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथे शनिवारी रात्री हा प्रकार घडला. निर्मला पोपळघट (४०) असे मृत महिलेचे नाव आहे.

सोनपेठजवळील कानेगाव खडका (जि. परभणी) सासर असलेली निर्मला लग्नानंतर काही दिवस पतीसोबत राहिली. त्यानंतर तिने पतीशी काडीमोड घेतला होता. तिला एक मुलगा होता, परंतु तो आजारपणात गेला. सात वर्षांपासून ती माहेरी राहत होती. दरम्यान, निर्मलाची वर्तणूक चांगली नसल्याने माहेरच्यांनी तिला वारंवार समजही दिली होती. परंतु काही सुधारणा झाली नाही. नवनाथ सुरेश चाफाकानडे (२५) व सुनील सुरेश चाफाकानडे (१९) या दोन भाच्यांना ही बाब खटकत असल्याने त्यांनी खुनाचा कट रचला. शनिवारी रात्री साडेआठ वाजता निर्मला पलंगावर झोपली असताना दोघे भाऊ तिच्या घरी गेले व तिच्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघे थेट माजलगाव ग्रामीण ठाण्यात गेले आणि गुन्ह्याची कबुली दिली.
बदनामीमुळेच खून
निर्मलाची वर्तणूक चांगली नव्हती. माहेरी आल्यानंतरही वर्तणूक सुधारली नाही. त्यामुळे बदनामीला कंटाळून भाच्यांनी तिचा खून केल्याचे आरोपींसह निर्मलाच्या माहेरच्या लोकांचे म्हणणे आहे.

Post a Comment

 
Top