0
जखमी तरुणाच्या मृत्यूमुळे पाथर्डीत तणाव, मृतदेह पोलिस ठाण्यात आणून पोलिसांचा निषेध

पाथर्डी - भांडणे सोडवण्यास गेलेल्या जखमी तरुणाचे नगर येथील खासगी रुग्णालयात शुक्रवारी पहाटे निधन झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला. उर्वरित आरोपींना त्वरित अटक करून गावगुंडांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी तरूणाच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलिस ठाण्यात आणून पोलिसांचा निषेध केला. दुकाने बंद करण्यास जमावाने भाग पाडले. दुपारी उशिरा तणाव निवळल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली. शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी शहरातील कोरडगाव चौकात मागील भांडणातूनन तनपूरवाडी येथील सतीश मोरे याचे बाबू धोत्रे, अमोल धोत्रे, राहुल धोत्रे, शंकर पवार त्याचा भारजवाडी येथील मेहुण्यासह इतरांबरोबर भांडण चालू असताना तनपूरवाडी येथील सचिन चंदू पवार ते सोडवण्यासाठी गेला. आरोपींनी सचिनच्या डोक्यात लाकडी दांडके दगड मारत त्याला गंभीर जखमी केले. त्या दिवशी आठवडे बाजार असल्यामुळे मोठी गर्दी होऊन सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
तनपूरवाडी येथील तरुणांनी गुरुवारी दुपारी पाथर्डीत येत व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. दहशतीमुळे अनेक व्यापाऱ्यांनी पटापट दुकाने बंद करून घेतली. जखमी तरुणावर नगर येथे उपचार चालू असताना शहरात अफवांचे पेव फुटले होते. शुक्रवारी पहाटे सचिनचे निधन झाल्याचे कळताच संतप्त जमावाने व्यापाऱ्यांना पुन्हा दुकाने बंद करण्यास भाग पाडले. काहींनी दुकानांच्या दिशेने दगड भिरकावले.
नगर येथून नातेवाईकांनी आणलेला मृतदेह थेट पोलिस ठाण्यात घेऊन जात आरोपींवर कारवाईचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, उर्वरित आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, मृताच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळावे, कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, न्यायालयीन कामकाजासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांनी नेमणूक करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण नायब तहसीलदारांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला. दरम्यान, मृतदेह नातेवाईक घेऊन जात असताना एका पोलीस नाईकामुळे पुन्हा वातावरण तणावपूर्ण बनले. संबंधित पोलिस नाईकावर धावून जाण्याचा प्रयत्न काही नातेवाईकांनी केला. पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यास बाजूला नेल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमली होती. सायंकाळी साडेचार वाजता तनपूरवाडी येथील स्मशानभूमीत वातावरणात सचिनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, शहरातील अराजकतेने असाहाय्य झालेल्या व्यावसायिकांना दिलासा देत नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगरसेवक रामनाथ बंग, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चोरडिया यांनी बाजारपेठेत फिरून व्यापारी टपरीधारकांना दुकाने उघडण्यासाठी धीर दिला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे प्रमुख चौकांत वाहतूक कोंडी गाड्या भरण्यावरून टोळीयुध्दे झडतात. पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. शहरासाठी दोन उपनिरीक्षक स्वतंत्र चार कर्मचारी देऊन शहर गुंडगिरीमुक्त करण्याची नागरिकांची मागणी आहे.
आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी 
या घटनेतील आरोपींना पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे येथे गुरुवारी रात्री आठ वाजता ताब्यात घेण्यात आले. यातील आरोपी बाबू धोत्रे, अमोल धोत्रे, राहुल धोत्रे, शंकर पवार यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायाधीश अस्मिता वानखेडे यांनी आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.

Post a Comment

 
Top