0


मुंबई- नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन ही सामान्य माणसांसाठी नाही तर ती श्रीमंत व व्यापारी वर्गाच्या कल्याणासाठी आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणातील अनेक रेल्वे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडून पडले आहेत. महाराष्ट्राचे आमदार-खासदार त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पांबाबत मागण्या करीत आहेत. त्या तशाच अधांतरी ठेवून ‘बुलेट ट्रेन’ न मागता मिळत आहे. यात फक्त चारच स्टेशन्स महाराष्ट्रात असून आठ स्टेशन्स गुजरातमध्ये आहेत. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातूनही जमीन संपादन करावी लागेल. त्यामुळे बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या छाताडावरूनच धावणार आहे. मुंबईची लूट बुलेट ट्रेनने होऊ नये हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना! अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन भूमिपूजन सोहळ्यावर टीकास्त्र सोडले आहे.
जपानचे पंतप्रधान शिंबो आबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज सकाळी दहाच्या सुमारास अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाचे भूमिपूजन केले. मात्र, त्याआधीच शिवसेनेने आपल्या मुखपत्रात बुलेट ट्रेनवरून भाजपवर शब्दांच्या फैरी झाडल्या आहेत. मोदींच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन ही महाराष्ट्रासाठी विशेष फायदेशीर नाही. गुजरातमध्ये आठ तर महाराष्ट्रात केवळ चार स्टेशन्स आहेत. तसेच ही बुलेट ट्रेन केवळ श्रीमंत व व्यापारी वर्गासाठीच सुरु होत असल्याच्या कोट्या उद्धव ठाकरेंनी सामनातून केल्या आहेत.
उद्धव ठाकरे अग्रलेखात म्हणतात की, बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल असे सांगणारे थापाच मारत आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि काम सुरू असताना जपानची कंपनी खिळय़ापासून रुळापर्यंत, खडीपासून सिमेंटपर्यंत सर्व तंत्रज्ञान त्यांच्या देशातून आणणार आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यास जपानी कंपनीने विरोध केला आहे. त्यामुळे जमीन आणि पैसा महाराष्ट्राचा व गुजरातचा; लाभ मात्र जपानचा. ही लूट आणि फसवणूक असली तरी पंतप्रधान मोदींच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पास आम्ही शुभेच्छा देत आहोत. गुजरातच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गास नवे काहीतरी द्यावेच लागेल. मुंबईची लूट बुलेट ट्रेनने होऊ नये हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना!.
अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेन राष्ट्रीय गरजांत बसते काय असा सवाल उपस्थित करून उद्धव पुढे म्हणतात, मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनचा साफ बोजवारा रोज उडत असला तरी आता अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. बुलेट ट्रेन हा नक्की कोणत्या समस्यांवर उतारा ते माहीत नाही; पण हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न होते व त्या स्वप्नपूर्तीची सुरुवात आज होत आहे. च्या स्वप्नाला विरोध करण्याचा कर्मदरिद्रीपणा आम्ही कदापि करणार नाही, कारण पंतप्रधान जे करीत आहेत ते राष्ट्रहित डोळय़ासमोर ठेवूनच करीत आहेत. पंडित नेहरूंनी भाक्रा-नांगलपासून भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरपर्यंत अनेक सार्वजनिक उपक्रमांचा पाया घातला. देश तंत्रज्ञान, विज्ञानात पुढे जावा यासाठी अनेक योजनांची पायाभरणी केली. कारण ती सर्व देशाची गरज होती. या राष्ट्रीय गरजांत जपानची अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन बसते काय, एवढाच काय तो मुद्दा आहे, असे टीकास्त्र सोडले आहे

Post a Comment

 
Top