0
आदिमायेचा जागर; जल्लोषात मिरवणुका;  घरोघरी, मंडळांत शक्तिदेवीची प्रतिष्ठापना

सोलापूर -ढगाळ वातावरणात गुरुवारी दिवसभर जल्लोषात मिरवणुका काढून भक्तांनी आदिशक्ती मातेची प्रतिष्ठापना केली. "आई राजा उदो उदो...' च्या गजराने शहरातील वातावरण ढवळून निघाले होते. तसेच घरगुती देवीची घटस्थापना होत नवरात्रीच्या पवित्र उत्सवास गुरुवारपासून सुरुवात झाली.
नवरात्र मंडळांनी दुपारनंतर जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणुका काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. एन. जी. मिल येथील गणराज तरुण मंडळाच्या मुलींच्या ढोल पथकाने लक्ष वेधून घेतले. निराळे वस्ती येथील अष्टभूजा मंडळामध्ये महिला आणि मुलींचे ढोल पथकाने लक्ष वेधले. वडार समाज मंडळ, आझाद हिंद मंडळ, मेघराज मंडळ, तुळजापूर वेस शक्ती मंडळ, शाहीर वस्ती जागृती मंदिर, दीपक शक्ती पूजा, गवंडी गल्ली, पत्रा तालीम, भागवत चाळ युवक मंडळ आदी मंडळांनी मिरवणुका काढल्या.
२५५ नवरात्र मंडळांचा मिरवणुकीत सहभाग 
सोलापूर शहराच्या विविध भागातून ४३६ मंडळांनी नोंदणी केली तर २५५ मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या. या मिरवणुकांकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ९०० पोलिस, ४०० होमगार्ड, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, फौजदार या दर्जाचे ७५ अधिकारी तैनात होते. मिरवणुकांमुळे काही अडचण होऊ नये म्हणून वाहतुक पोलिसांनी योग्य नियोजन केले होते.
दुर्गा माता दौडमधून जागर
सबंध महाराष्ट्रातच खेडोपाडी पहाटेच्या ब्रम्ह मुहूर्तावर हातात भगवा ध्वज आणि शस्त्रे घेऊन तमाम धारकरींकडून दुर्गा माता दौड काढण्यात आली. हे मागणे स्वत:साठी नाही, तर राष्ट्रासाठी आहे, धर्मासाठी आहे. ही नवरात्र हे राष्ट्रीय नवरात्र म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान साजरे करते. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की अशा जयघोषात ही दौड काढण्यात आली. आई भगवतीला भल्या पहाटे विनवणी करणारा हा उपक्रम म्हणजे दौड होय. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत शहराच्या विविध भागातून ही दौड काढली जाते. आजची दौड सोलापूर बसस्थानक ते श्री रूपाभवानी मंदिर अशी होती.
मिरवणुकांनी वेधले लक्ष
शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी विधिवत पूजन करीत देवीची प्रतिष्ठापना केली. तसेच गुरुमाता मंडळ, जय भवानी, कैकाड गल्लीतील ज्ञानेश्वर नवरात्र, वडार समाज मंडळ तसेच नवी पेठ व्यापारी मंडळ आदींनी लेझीम ताफ्यासह सवाद्य मिरवणुका काढल्या. यात शिवशक्ती संस्था, लोणार गल्ली यांच्या लेझीम मंडळाच्या पथकाने लक्ष वेधून घेतले.



रूपाभवानी मंदिरात दर्शनासाठी रांगा
नवरात्रालाआजपासून सुरुवात झाली. सकाळपासून घटस्थापनेसाठी लगबग होती. सोलापूर ते तुळजापूर आणि विजापूर रस्ता ते श्री रूपाभवानी मंदिर हे रस्ते तर केवळ ज्योत मिरवणूक आणि भाविकांनी भरून गेलेले दिसत होते.

Post a Comment

 
Top