0

नवी दिल्ली, दि. 14 - दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. एका टॅक्सी चालकाने मदत करण्याच्या बहाण्याने 23 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यमुना खादर परिसरातील गोल्डन जुबिली पार्क येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करत आरोपी ड्रायव्हर चुन्नू कुमारला अटक केली आहे. दंडाधिका-यांसमोर हजर केल्यानंतर आरोपी चुन्नू कुमारला तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
पीडित तरुणी झारखंडची रहिवासी असून, नोएडा येथे आपल्या भावला भेटण्यासाठी आली होती. लुधियानाला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी रात्री 11 वाजता ती दिल्ली रेल्वे स्थानकावर आली होती. ट्रेन सकाळी 4.30 वाजता येणार होती, त्यामुळे तिने वेटिंग रुममध्ये जाऊन आराम करायचं ठरवलं. रात्री दोन वाजता तरुणी वेटिंग रुममधून बाहेर आली. हीच संधी साधत चुन्नू कुमारने तिच्याशी संवाद साधला आणि ट्रेन रद्द झाल्याची खोटी माहिती दिली. 
आरोपी चुन्नू कुमारने तरुणीला बसस्टॅण्डवर सोडण्याची ऑफर दिली. आयएसबीटी येथून तुम्हाला लुधियानाला जाणारी बस मिळेल असं सांगत त्याने तरुणीला आपल्या जाळ्यात अडकवलं. आधीच उशीर झाला असल्याने तरुणीही तयार झाली. पण आरोपी चुन्नू कुमारने टॅक्सी बसस्टॅण्डला न नेता लाल किल्ल्याजवळील गोल्डन जुबिली पार्क येथे नेऊन तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने धमकी दिली होती की, जर का मागणी पुर्ण केली नाही तर माझ्या सगळ्या मित्रांना बोलावून सामूहिक बलात्कार करेन. यानंतर आरोपी ड्रायव्हर चुन्नू कुमारने तरुणीला जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोडलं.
पीडित तरुणीने कोतवाली येथे पोहोचल्यानंतर पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. तरुणीने संपुर्ण घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. आरोपी ड्रायव्हरने आपला मोबाइल क्रमांक दिला होता. पोलिसांनी मोबाइल ट्रॅक करत आरोपी ड्रायव्हर चुन्नू कुमारला अटक केली आहे. चौकशी केली असता, आपलं पैशांवरुन तरुणीसोबत भांडण झाल्याचा दावा त्याने केला आहे. आरोपीला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. 

Post a Comment

 
Top