
पुणे-पुण्यातल्या वात्सल्य मॅटर्निटी होम येथे इन्क्युबेटरमध्ये भाजल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. इन्क्युबेटरने पेट घेतल्याने नवजात बाळ 95 टक्के भाजले. पुण्यातील बुधवार पेठेतील वात्सल्य मॅटर्निटी होममध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयेंद्र आणि स्वाती कदम या दाम्पत्याला मुलगी झाली होती. बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी तापमान प्रमाणाबाहेर वाढले आणि इन्क्युबेटरने पेट घेतला. या घटनेत नवजात बाळ 95 टक्के भाजले. मंगळवारी (26 सप्टेंबर) सकाळी ही घटना घडली होती.
इन्क्युबेटरने पेट घेतल्यानंतर स्फोटासारखा आवाज येऊन मशिनमधून धूर आल्याचा दावा कदम कुटुंबीयांनी केला आहे. शॉर्टसर्किटमुळे इन्क्युबेटर ओव्हरहिट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम रिक्षा चालवतात. त्यांची पत्नी स्वातीला सोमवारी रात्री प्रसूतीवेदना होऊ लागल्यामुळे त्यांना अप्पा बळवंत चौकातील तांबडी जोगेश्वरी मंदिरा समोरील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्वाती यांची तपासणी केल्यानंतर डिलेव्हरी सकाळी करू, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास स्वाती यांचे सिझर करण्यात आले. त्यावेळी स्वाती सुखरूप होत्या मात्र बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आलेे. काही वेळाने बाळाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल, असे सांगून डॉक्टर निघून गेले.
तासाभराने बाळ ठेवलेल्या इन्क्युबेटरने अचानक पेट घेतला. त्यावेळी स्वाती यांच्या नातेवाइकांनी आरडाओरडा केला. डॉक्टरांनी बाळाला बाहेर काढेपर्यंत बाळ गंभीररित्या भाजले. बाळाला तात्काळ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, बाळाने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी नातेवाइकांचे जबाब घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment