0
लंडन बॉम्बस्फोट प्रकरणात दुसऱ्या संशयितास अटक; वसतिगृह चालवणाऱ्या दांपत्यावर छापा

लंडन- लंडन येथील भुयारी रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने शनिवारी मध्यरात्री २१ वर्षीय युवकाला अटक केली. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. केंट पोलिसांनी याआधी शनिवारी सकाळी डोव्हरच्या बंदर भागातून एका १८ वर्षीय युवकाला अटक केली होती. दरम्यान, अजूनही दहशतवादी हल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सतर्कता बाळगली जात आहे.
दहशतवाद प्रतिबंधक पथकाचे राष्ट्रीय समन्वयक नील बसू यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बॉम्बस्फोट प्रकरणासाठी जबाबदार असणाऱ्या आरोपींना शोधण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी महानगर पोलिस आणि त्यांच्या सहकारी संस्था २४ तास कार्यरत आहेत. या हल्ल्यासाठी एकापेक्षा जास्त जण जबाबदार असावेत, अशी शक्यता आहे. आम्ही त्या दिशेने वेगाने प्रयत्न करत आहोत.
या प्रकरणात पहिली अटक झाल्यानंतर महानगर पोलिसांच्या दहशतवाद प्रतिबंधक शाखेच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सनबरी, सरे आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडमधील नागरी भागात शोध मोहीम हाती घेतली होती. तेथील इमारतींमधील नागरिकांना इतरत्र हलवण्यात आले होते. शेकडो निर्वासित मुलांना आश्रय दिल्याबद्दल रोनाल्ड जोन्स (८८) आणि पेनेलोप जोन्स (७१) या वृद्ध ब्रिटिश दांपत्याला महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी २०१० मध्ये सन्मानित केले होते. या दांपत्याच्या घरावर पथकाने छापा टाकला. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १८ वर्षीय संशयित युवकाला या दांपत्यानेच आश्रय दिला होता, असे समजते.

इस्लामिक स्टेटच्या (आयएस) एका गटाने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. पण हल्लेखोरांशी संबंध असो की नसो, आयएस कुठल्याही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारते, अशी टिप्पणी लंडनचे सहायक पोलिस आयुक्त मार्क राउली यांनी केली होती. या स्फोटाला ‘बकेट बॉम्ब’ असे संबोधण्यात आले होते.
धमकीनंतर ब्रिटिश एअरवेजचे विमान केले रिकामे
पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल विमानतळावर रविवारी सुरक्षा कारणांमुळे ब्रिटिश एअरवेजच्या प्रवाशांना त्वरित उतरवण्यात आले. विमानाला धमकी मिळाल्याने ते रिकामे करून घेतले जात आहे, असे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यावेळी बीए ३०३ हे विमान पॅरिस येथून लंडनला उड्डाण करणार होते. धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या पथकाने विमानाला चारही बाजूंनी घेरले.

Post a Comment

 
Top