
पिंपरी- प्रस्तावित होऊ घातलेली मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेन अजिबात कामाची नाही. त्यापेक्षा मुंबई लोकल रेल्वेची तत्काळ सुधारणा करा, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. मुंबईतील चेंगराचेंगरी घटनेला भाजप सरकार जबाबदार आहे असा घाणाघातही त्यांनी केली.
अजित पवार आज पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. आज सकाळपासून ते विविध बैठका घेत आहेत. मात्र, त्याच दरम्यान, मुंबईत रेल्वेच्या परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू तर 36 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतात 14 पुरुष तर 8 महिलांचा समावेश आहे.
या घटनेची माहिती मिळताच अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला. पवार म्हणाले, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा मुंबईकरांना काहीही फायदा होणार नाही. जो काही फायदा होईल तो गुजरातला होईल. मुंबईतील दीड कोटी जनतेला दिलासा द्यायचा असेल तर जे आहे त्या मुंबई लोकल रेल्वेची आधी सुधारणा कराव्यात मग काय बुलेट ट्रेन वगैरे आणायचे आहे ते आणावे. रेल्वेचे सक्षमीकरणावर भर देणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत असेही अजित पवारांनी सांगितले.
Post a Comment