0
मुंबईतील हजारो कोटींच्या उलाढालीस पावसाने ब्रेक; सराफा बाजार, भाजीपाला आवक झाली कमी

मुंबई- बुधवारी दिवसभर कोसळत राहिलेल्या पावसाचा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीतील हजारो कोटींच्या उलाढालीस ब्रेेक लागला. सोन्याची दुकाने, हाॅटेल्स, मशीद बंदरचा धान्य बाजार, वाशीचे फळभाजी मार्केट, केईएम-नायरच्या ओपीडी, टॅक्सी चालक, विमान कंपन्या आणि दांडिया-गरबा आयोजक यांचा पूर्ण धंदा पावसाच्या पाण्यात गेला.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दैनंदिन ७०० विमानांची ये-जा होते. मिठीचे पाणी घुसल्याने बुधवारी मुख्य धावपट्टी बंद होती. त्यामुळे ५६ फेऱ्या इतरत्र वळवण्यात आल्या, तर १८० उड्डाणे रद्द करण्यात आली. विमान कंपन्यांना तिकिटांचा परतावा करावा लागला. देशाबाहेरून आलेल्या प्रवाशांना दिल्लीत उतरून कोची, कोलकाता, अहमदाबादला जावे लागले. गाड्या अडकण्याच्या भीतीने मुंबईतील ८० टक्के रिक्षा, टॅक्सी, कॅब साइड ट्रॅकला होत्या. या दिवशी सुमारे दीड लाख रोजगार बुडाला असल्याचे टॅक्सी युनियनचे नेते राॅड्रिग्ज म्हणाले. मशीद बंदरच्या धान्य, सुकामेवा, तेल बाजारात दैनंदिन १० कोटींची उलाढाल होते. त्या दिवशी पुराच्या भीतीने बहुतेक व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले होते. परळ, सेंट्रल, कुर्ला आगारातून दैनंदिन एसटीच्या ४८० फेऱ्या होतात. त्यातून ९ हजार प्रवासी ये-जा करतात. बुधवारी तिन्ही आगाराच्या एसटीतून ४ हजार प्रवाशांनी प्रवास केला. मध्य आणि पश्चिम रेल्वेला २० टक्के फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. कर्मचारी कामावर पोहोचू न शकल्याने बेस्टला १७५ बस रस्त्यावर उतरवता आल्या नाहीत. 
डाॅक्टर मंडळींनासुद्धा पावसाचा फटका बसला. केईएमच्या ओपीडीत ३५ टक्के रुग्ण कमी आले. नायर रुग्णालयात प्रतिदिन येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ५५ टक्के घट झाली, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल यांनी सांगितले. गरबा अाणि दांडियांच्या आयोजकांना दोन दिवसांच्या पावसाचा फटका बसला. दांडियासाठी कपडे विकणारे व्यापारी आणि टॅटूमेकर्स यांचाही पावसाने दाेन दिवस धंदा बसवला. मंत्रालयात बुधवारी २३ टक्के कर्मचारी उपस्थित होेते. खासगी कार्यालयांतही कर्मचाऱ्याचा शुकशुकाट होता. सिनेमागृहे आणि नाटकांच्या खेळांनाही बुधवारी प्रेक्षकांची अल्प उपस्थिती होती.
२९ आॅगस्टसारखी आजही मुंबई तुंबणार या भीतीने मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले नाही.
सराफा बाजार, भाजीपाला आवक झाली कमी
वाशी मार्केटमध्ये दैनंदिन ५०० ते ६०० भाज्यांच्या गाड्यांची आवक होते. बुधवारी दोनशे गाड्यांची आवक कमी झाली तसेच भाज्यांना उठाव नव्हता. भाज्यांचे २० टक्के भाव घसरले होते, असे समितीचे माजी संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले. बुधवारी पावसामुळे लोक घराबाहेर पडले नाहीत त्यामुळे सोन्याच्या पेढीची िवक्री ५० टक्क्याने घटल्याचे पेडणेकर ज्वेलर्सच्या आनंद पेडणेकर यांनी सांगितले. पावसाच्या भीतीने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली. त्याचा किरकोळ व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसल्याचे रिटेल ट्रेडर्स असोसिएशनचे विरेन शहा यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top