0
7 day extension for filing loan waiver application online

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत 22 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्यापर्यंत फॉर्म भरणं आवश्यक होतं. आतापर्यंत तब्बल 44 लाख शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचं बाकी आहे. त्यामुळे आजही अनेक शेतकरी सुविधा केंद्राच्या रांगेत उभं राहून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहेत.
कर्जमाफीसाठी आतापर्यंत (14-09-2017 पर्यंत) 96 लाख 59 हजार 740 अर्जाची नोंदणी झाली आहे. तर 49 लाख 56 हजार 305 शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत याआधी 15 सप्टेंबर 2017 होती.
सरकारने 7 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. मात्र फॉर्म भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. तर अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. धुळ्यात शहरी भागातील ग्राहक सेवा केंद्रात 4-4 दिवस नंबर लागत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. तिकडे बीड, परभणी आणि लातूरमध्येही थोड्याफार फरकाने हिच स्थिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम मिळेल असं आश्वासन दिलं आहे. मात्र आता मुदत वाढवल्याने वेळेत अर्जांची छाननी होऊन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जाची रक्कम मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच कर्जाची रक्कम देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करु, असं आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिलं आहे.

Post a Comment

 
Top