
मुंबई- संपाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजारावरून ६ हजार ५०० तर मदतनीसांचे मानधन अडीच हजार रुपयांवरून ३ हजार ५०० रुपये अाणि मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ३ हजार २५० रुपयांवरून ४ हजार ५०० रुपये करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १ हजार रुपयांची भाऊबीज दिली जाते. या रकमेत दुपटीने वाढ करून २ हजार रुपये देण्यात येईल. आजच्या निर्णयाने राज्य सरकारवर ३६३ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे मुंडे म्हणाल्या. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बऱ्याच अंगणवाडी सेविका कामावर परतल्या अाहेत. राज्यातील २५ टक्के अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार वाटपाचे काम सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
संप फोडला; पंकजांवर आरोप
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करत अकरा दिवसांचा संप मिटल्याचे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी जाहीर केले. मात्र, अंगणवाडी कृती समितीच्या सात संघटनांनी मंत्री मुंडे यांनी एका बोगस संस्थेला हाताशी धरून संप फोडण्याची कृती केली आहे. आमचा संप मिटलेला नाही, त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत, असे स्पष्ट केले.
मुंडे यांनी ज्या संघटनेशी बोलणी ती बोगस आहे. या संघटनेचा प्रभाव केवळ नवी मुंबईपुरता आहे. संपात सात संघटनांनी सहभागी आहेत. त्यांच्याकडे राज्यातील ९९ टक्के अंगणवाडी कर्मचारी सभासद आहेत. सातपैकी एकही संघटना सरकारच्या वाटाघाटीत नव्हती, असे कृती समितीचे निमंत्रक एम.ए. पाटील यांनी सांगितले.
शेतकरी संपात मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे बोगस संघटनेशी मध्यरात्री बोलणी केली होती. मात्र, शेतकऱ्यांनी तो निर्णय न मानता संप मागे घेतला नव्हता. तसाच प्रकार मुंडे यांनी केला आहे. सरकारने दिलेली तुटपुंजी पगारवाढ सात मुख्य संघटनांना मान्यच नाही. संपावर आजही आम्ही ठाम आहोत, असे संपाच्या नेत्या शुभा शमीम यांनी सांगितले. २७ सप्टेबर रोजी मुंबईत अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी मेळावा आहे. मेळाव्यास राज्यातून ५० हजार अंगणवाडी कर्मचारी येणार आहेत, मेळाव्यास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत, असे संघटनेचे नेते सुकुमार दामले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Post a Comment